सोलापूर- कृषी मित्र नावाच्या पदासाठी फसव्या जाहिरात व्दारे तरुणांची दिशाभूल केली जात असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले असून . काही वृत्तपत्रे, सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांतून “कृषीमित्र” नावाच्या पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती होत असल्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जात आहेत. या जाहिरातींमध्ये आकर्षक वेतन व मोठ्या संख्येने पदे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे.
याबाबत कृषी आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की, कृषी विभागामध्ये “कृषीमित्र” या नावाचे कोणतेही अधिकृत पद अस्तित्वात नाही. तसेच कृषी विद्यापीठांमध्येही अशा पदनामाची कोणतीही शासनमान्य भरती प्रक्रिया सुरु नाही. त्यामुळे संबंधित जाहिराती या दिशाभूल करणाऱ्या असून बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता आहे.
शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून संबंधित जाहिरातींची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यकतेनुसार संबंधित संस्था, व्यक्ती अथवा जाहिरातदारांविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
कृषी विभाग सर्व शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती तसेच नागरिकांना आवाहन करीत आहे की, अशा कोणत्याही जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित माहितीची खातरजमा करावी. शासनाच्या अधिकृत भरतीविषयक जाहिराती केवळ शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर व अधिकृत माध्यमांतूनच प्रसिद्ध केल्या जातात.
कोणत्याही संशयास्पद जाहिराती अथवा भरती प्रक्रियेबाबत माहिती मिळाल्यास जवळच्या कृषी कार्यालयाशी किंवा संबंधित प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा. अश्या कोणत्याही जाहिरातीला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.











