उपमुख्यमंत्री अजित पवार काल उत्तर सोलापुरातील वडाळ्यामध्ये काका साठे यांच्या पक्षप्रवेशासाठी आले होते. अजित दादांचे हेलिकॉप्टर लोकमंगल कॉलेजच्या मैदानावर उतरले होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमधून आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख आले कसे याबाबत चर्चेला उधाण आले आहे. याबाबत कोणत्याच माध्यमांमध्ये माहिती आली नाही हे विशेष. अजितदादा समवेत रोहन देशमुख हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवाय त्यांनी वडाळ्यामध्ये अजित पवार यांची स्वागत केले यावेळी मनीष देशमुख देखील उपस्थित होते. एकीकडे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला सुभाष देशमुख यांनी सडेतोड विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मनात सुभाष देशमुख यांच्या बद्दल नाराजी आहे. त्यातच रोहन देशमुख अजितदादा सोबत हेलिकॉप्टर मधून वडाळ्यामध्येआल्यामुळे आणखीनच चर्चेला ऊत आला आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ऐनवेळी भाजपने राणा जगजीत सिंह पाटील यांना आणून उमेदवारी दिल्यामुळे रोहन देशमुख नाराज होते. त्यामुळे ते राजकारणापासून अलिप्त झाले होते. आता रोहन देशमुख अजित दादा सोबत जाणार की आ. सुभाष देशमुख यांनाच राष्ट्रवादी अजित पवार गटात घेण्यासाठी ही साखर पेरणी असणार याचे कोडे सर्वांनाच पडले आहे. दिलीप माने यांना भाजपने प्रवेश दिलाच तर सुभाष देशमुख यांची ही वेगळी चाल असू शकते असे बोलले जात आहे. याबाबत रोहन देशमुख यांना विचारले असता ते म्हणाले की अजितदादा आमच्या लोकमंगल कॉलेजच्या हेलीपॅड वर उतरणार होतै त्यामुळे त्यांच्यासोबत पुण्यातून आलो. बाकी दुसरा काही अर्थ काढू नये. यामुळे आता बारामती पॅटर्न प्रमाणे सुभाष देशमुख यांच्या घरात देखील दोन पक्ष असतील काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

