फक्त माजी सैनिक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू
सोलापूर, दि. 14 (जिमाका): सैनिक कल्याण विभाग व त्याच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात लिपिक टंकलेखक (गट-क) पदांच्या सरळसेवा भरतीसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 72 पदे उपलब्ध असून त्यापैकी 01 पद अपंग संवर्गासाठी राखीव आहे. सदर पद दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरले जाणार आहे.
ही भरती प्रक्रिया TCS-iON या संस्थेमार्फत राबविण्यात येणार असून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज सादर करण्याची मुदत व संकेतस्थळ: पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Resources Tab > Recruitment Tab मध्ये 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून ते 05 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर वेबलिंक बंद करण्यात येईल.
सोलापूर जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक उमेदवारांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.

