सोलापूर : मुळेगाव रोड येथील सरवदे नगरामध्ये एक घटना रविवारी दुपारी १२ च्या सुमारास उघडकीस आली. या धक्कादायक घटनेत एका मातेनं आपल्या दोन लेकरांसह गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागिरकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. या घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.
स्नेहा संतोष चिल्लाळ (वय- ३०), संध्या संतोष चिल्लाळ (वय- ११), मनोजकुमार संतोष चिल्लाळ (वय- ७, सर्व रा. प्लॉट नं. ५, सरवदे नगर, जुना विडी घरकूल, सोलापूर) अशी मयतांची नावे आहेत. शासकीय रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. मात्र सदर महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. हा प्रकार पाहिल्यानंतर सदर महिलेचे पती संतोष सरवदे यांनी टाहो फोडून आजूचाजूच्या लोकांना जमवले. त्यानंतर तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्याला या घटनेची खबर देण्यात आली.