सोलापूर, दिनांक 21( जिमाका):- कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे लाखो भाविक, वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येतात. या सर्व भाविकांना जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. परंतु ही कार्तिकी वारी, स्वच्छतेची वारी ठरावी यासाठी येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार स्वच्छताविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
कार्तिकी शुद्ध एकादशी दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होत आहे. दिनांक 27 नोव्हेंबर पर्यंत पासून यात्रा कालावधी पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व वारकरी व भाविकांना स्वच्छतेच्या अनुषंगाने दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्यावतीने सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. पंढरपूर येथे किमान आठ ते दहा लाख भाविक येथील असे गृहीत धरून प्रशासनाच्या वतीने सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने सुलभ इंटरनॅशनल कायमस्वरूपी शौचालय, प्री फॅब्रीकेटेड शौचालय, कायमस्वरुपी सार्वजनीक शौचालय उपलब्ध करण्यात आली आहेत. या ठिकाणी मुबलक पाणीपुरवठा तसेच साफसफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शहरामध्ये कुठेही कचरा साठू नये यासाठी अनेक ठिकाणी कचराकुंडी तसेच तेथून कचरा घेऊन जाण्याची व्यवस्था केलेली असून शहर स्वच्छ व सुंदर रहावे यासाठी नगर परिषदेच्यावतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. भाविकांना पिण्याचे शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शहरात येणाऱ्या मुख्य मार्ग तसेच शहरात अनेक ठिकाणी तसेच दर्शन रांग व मंदिर परिसरात व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथे येणाऱ्या भाविकांनी रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नये.नगरपालिकेने उपलब्ध करून देण्यात आलेल्या कचराकुंडीतच कचरा टाकावा व शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे.
यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूर येथे येत असल्याने शहरात सर्वत्र स्वच्छता चांगली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. यात्रा कालावधीत स्वच्छतेबाबत प्रशासन मंदिर समिती यांनी स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनाचे प्रभावी अंमलबजावणी करावी याबाबत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी निर्देश दिलेले आहेत. तसेच स्वच्छतेबाबत ज्या सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत त्याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी जिल्हाधिकारी यांनी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याबाबत सूचित केले आहे.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी कार्तिकी यात्रा कालावधी पंढरपूर शहर स्वच्छ रहावे यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अर्चना गायकवाड, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव,कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, तालुका आरोग्य डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे व संबंधित विभाग प्रमुखांना परस्परात योग्य समन्वय ठेवून काम पार पडावे असे आवाहन केले आहे.
दर्शन, पत्राशेड, नदीपात्र वाळवंट, 65 एकर ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येतात. या शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता व मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता करण्यात यावी. तसेच मंदीर परिसर , दर्शन रांग, नदी पात्र, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेसाठी जादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. वाळवंटात असणारे दगड, कपडे, कचरा काढून घ्यावा. भाविकांना यात्रा कालावधीत स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता ठेवावी. नदी पात्रावरील सर्व घाटांची स्वच्छता करण्यात यावी. दर्शन रांगेजवळ असणाऱ्या तात्पुरत्या विश्रांती कक्षामध्ये भाविकांना औषध उपचार केंद्र, स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, शौचालय आदी सुविधांची उपलब्धता करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिलेल्या आहेत.
कार्तिकी वारी अनुषंगाने येथे येणाऱ्या भाविकांना इतर सोयी सुविधा बरोबरच स्वच्छतेच्या सुविधा चांगल्या प्रकारे मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद स्वतः लक्ष घालत आहेत. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तीन ते चार बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या अनुषंगाने मार्गदर्शक दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मंदिर परिसर, नदीपात्र, नदीपात्रावरील घाट, शहरातील महत्वाची ठिकाणे, 65 एकर, कायमस्वरूपी शौचालय या ठिकाणी भेटी देऊन नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नये असे निर्देश दिलेले आहेत.