केंद्र सरकारच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2023-2024‘ हे अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये सोलापूर महानगरपालिका देखील सहभागी आहे. या मध्ये सिवेज लाईन्स, मॅनहोल आणि सेफ्टिक टँकची होणारी धोकादायक पध्दतीने माणसांकडून होणारी सफाई पूर्णपणे थांबवून त्याठिकाणी यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करण्यास प्राधान्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हे सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान राबविले जात असून सोलापूर महानगरपालिके कडून सफाई मित्र यांच्या करिता आयुक्त शितल तेली – उगले व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा स्मृती मंदिर येथे आज कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होते.
यावेळी कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता श्री. विजयकुमार राठोड यांनी आपल्या मनोगतात सन 2013 मध्ये ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजर अॅक्ट 2013’ लागू झाला आणि मलवाहिन्यांच्या साफसफाईमध्ये मानवी वापर न करण्याचे निश्चित करण्यात आले. सिवेज लाईन्स, मॅनहोल आणि सेफ्टिक टँकच्या साफसफाईची कार्यवाही माणसांकडून न करता जेटींग, रिसायकलींग, रॉडींग अशा विविध प्रकारच्या यांत्रिकी पध्दतीने करीत आहे अशी माहिती दिली.
या प्रशिक्षणामध्ये काम फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्मिता सिंग यांनी सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज या अभियानात अंतर्भूत असलेल्या मलनि:स्सारण वाहिन्यांची साफसफाई यांत्रिकी मशिनव्दारे करणेविषयी तसेच सुरक्षिततेविषयी विविध बाबींचे सादरीकरण करुन मार्गदर्शन केले. या मध्ये मलवाहिन्यांच्या साफसफाईमध्ये हस्तक्षेप न करता ती यांत्रिकी मशीनव्दारे करण्याच्या दृष्टीने, मलवाहिनी व मशीन होल यांच्या साफसफाईसाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या अद्ययावत यंत्रसामुग्री व उपकरणांची माहिती देण्यात आली. साफसफाई करताना सफाई मित्रांसाठी हेल्मेट, हॅण्ड ग्लोव्हज, गमबूट, मास्क, युनिफॉर्म, फस्ट एड बॉक्स, गॅस मॉनिटर, ऑक्सिजन सिलेंडर, रिफेलेवटींग जॅकेट, टॉर्च अशा सुरक्षा साधन स्वरूपातील सेफ्टी किटची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले तसेच मलनि:स्सारण विषयक काम करणा-या सफाईकर्मींनी वर्षातून एकदा तरी आपली संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे सूचित करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये ड्रेनेज विभाग प्रमुख रामचंद्र पेंटर, हेमेंत डोंगरे तसेच सर्व विभागीय अधिकारी, मलनि:स्सारण कामकाज पाहणारे सर्व कनिष्ठ अभियंते तसेच २०० सफाई मित्र या प्रशिक्षणाप्रसंगी उपस्थित होते.