राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी लवंग (ता. माळशिरस) येथील होटेल राजमुद्रा येथे टाकलेल्या छाप्यात मा. न्यायालयाने धाबा मालक व 3 मद्यपींना एकूण 28 हजारांचा दंड ठोठावला आहे. सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन विभागाच्या अकलूज विभागाचे दुय्यम निरिक्षक राजेंद्र वाकडे यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील लवंग गावाच्या हद्दीतील होटेल राजमुद्रा येथे छापा टाकला असता होटेल मालक योगीराज गोरख वाघ, वय 24 वर्षे हा ग्राहकांना दारु पिण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देत असल्याचे आढळून आला. तसेच त्या ठिकाणी दारू पीत बसलेले मद्यपी ग्राहक दत्तात्रय भिमराव चव्हाण वय 43 वर्षे, सूरज धनाजी चव्हाण वय 25 वर्षे व नवनाथ भजनदास जाधव वय 21 वर्षे या तीन ग्राहकांना जागेवरच अटक करण्यात आली.
या कारवाईदरम्यान विभागाने 180 मिलीच्या रॉयल स्टॅग व्हीस्कीच्या 5 बाटल्या, देशी दारु सखु संत्रा ब्रॅंडच्या 15 बाटल्या, डॉक्टर ब्रॅंडीच्या 5 बाटल्या, चार स्टील ग्लास व एक कापडी पिशवी असा एकूण असा रुपये दोन हजार सहाशे पन्नास किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्यातील तपास अधिकारी यांनी एका दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र बुधवारी न्यायालयात सादर केले असता मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी माळशिरस श्री आलोक देशपांडे यांनी हॉटेल चालकाला 25 हजार रुपये दंड व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संदिप कदम, दुय्यम निरीक्षक राजेंद्र वाकडे, कैलास छत्रे, सहायक दुय्यम निरीक्षक रवी पवार, जवान तानाजी जाधव, गजानन जाधव व विजयकुमार शेळके यांच्या पथकाने पार पडली.
आवाहन
जनतेला आव्हान करण्यात येते की, त्यांच्या परिसरात दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास या विभागाला त्याची माहिती द्यावी. तसेच धाब्यावर बसून दारू पिणे हे कायद्याने गुन्हा असून यापुढे धाब्यांवर बसून दारू पिणाऱ्या ग्राहकांची गय केली जाणार नाही, असे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी इशारा दिला आहे.