सांगली (सुधीर गोखले) – आज इसरो च्या चांद्रयान मोहीम ३ ची यशस्वी मोहीम पार पडली आणि सर्वत्र आनंदोत्सव साजरा झाला. आजच्या या मोहिमेच्या यशामागे तब्बल 20 वर्षांची मेहनत आहे. सलाम त्या शास्त्रज्ञांना, संशोधकांना आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या प्रत्येकाला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपयीं यांनी २००३ मध्ये स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन चंद्रयान १ मोहिमेची घोषणा केली होती. त्यानंतर २००३ नंतर चांद्रयान मोहिमेवर काम सुरू झालं. २२ ऑक्टोबर २००८ ला सतीश धवन स्पेस सेंटरमधून चंद्रयान १ लॉन्च झालं. नोव्हेंबर २००८ मध्ये हे चंद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. याच मोहिमेमुळे चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते, त्याला नासानं पुष्टी दिली हा भारतीयांच्या दृष्टीने एक मिळालेले यश म्हणावे लागेल. चंद्रयान १ मोहिमे अंतर्गत चंद्रयान एक वर्षं चंद्राच्या कक्षेत राहिल आणि त्यानं कक्षेत तब्बल ३४०० फेऱ्या मारल्या.
चांद्रयान २ मोहीम निराशाजनक राहिली या मोहिमेने शास्त्रज्ञांची परीक्षाच पाहिली. ७ सप्टेंबर २०१९ ला मध्यरात्री अडीच वाजता श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधली निराशा सगळ्या देशानं नाही तर जगाने पाहिली. शास्त्रज्ञांच्या ११ वर्षांच्या मेहनतीनंतर आणि ४७ दिवसांच्या प्रवासानंतर विक्रम लँडर क्रॅश झालं होतं. पण याच अश्रूंमधून इस्रोनं पुन्हा गगनभरारी घेतली, आणि पुढील चार वर्षांतच चंद्रयान ३ चंद्राकडे झेपावलं. अशक्य अशा समजल्या जाणाऱ्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगचं मोठे आव्हान भारतानं स्वीकारलंय.
पृथ्वीपासून चंद्र सुमारे चार लाख किलोमीटर दूर आहे. मंगळापेक्षाही चंद्रावर लँड करणं कठीण आहे. चंद्रावर वायुमंडळ नाही प्रचंड अंधार असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारत चंद्रयान उतरवणार आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात चंद्रावर चंद्रयान उतरेल, आणि भारत विज्ञानाच्या क्षितिजावर नवा ठसा उमटवेल यात शंका नाही.
आज श्रीहरिकोटामधल्या स्पेस सेंटरमधून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रयान ३ चंद्राकडे झेपावलं. LVM ३ या लाँच व्हेईकलमधून चंद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर १६ व्या मिनिटाला LVM-3 रॉकेटनं 179 किलोमीटरच्या प्रवासानंतर चंद्रयानाला अवकाशात सोडलंय पुढचा प्रवास चंद्रयान स्वतः करणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये यानाचा पृथ्वीभोवतीच्या कक्षेत संचार होईल. त्यानंतर चंद्रा जवळच्या दीर्घ वर्तुळाकार कक्षेत यान स्थिरावेल. २३ ते २४ ऑगस्ट दरम्यान लँडर चंद्रावर उतरेल . ४२ दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान चंद्रावर पोहोचेल. साधारणपणे पाच ऑगस्टच्या दरम्यान चंद्राच्या कक्षेत चांद्रयानाचा प्रवेश होईल. २३ ऑगस्टला चांद्रयानाची गती कमी होईल. या सर्व मोहिमेत कोणतीही चूक होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आलीये. भारत जमिनीवरची ताकद वाढवण्याबरोबरच अवकाशातही आपला दबदबा वाढवायला सज्ज झालाय.