पुणे – आज राज्यात धुळवड सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मावळमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. जयदीप पाटील अस मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. सात ते आठ जणांचा ग्रुप धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी मावळ मधील वराळे गावामधील इंद्रायणी नदी परिसरात गेले होते. त्यावेळी मयत जयदीप आणि त्याचे काही मित्र रंग धुण्यासाठी पाण्यात उतरले असता नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने जयदीप पाटील यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. वराळेमधील डॉ डी.वाय. पाटील महाविद्यालयात हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत होते. तर मयत विद्यार्थी जयदीप पाटील हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील तारखेड गावातील रहिवासी आहे.