No Result
View All Result
- सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील दहावी परीक्षा केंद्रावर काल गुरुवारी ता. २ रोजी दहावी इयत्तेच्या मराठी विषयाच्या पेपरला प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांची उत्तरे चक्क फळ्यावर लिहून देण्याचा प्रकार घडला. सामुहीक कॉपीप्रकरणात येथे शिक्षकांचीच धडपड दिसली. कॉपीमुक्ती नांदेड पॅटर्न, भरारी पथक, बैठे पथक, कॉपीसंबंधी कठोर कारवाई हे सगळे काही बासनात गुंडाळले गेले. दहावी बोर्ड परीक्षेची ऐशीतैशी दिसली.
- विशेष म्हणजे या केंद्रावरील सामुहीक कॉपीचा हा सुळसुळाट पाहून वर्षभर प्रामाणिकपणे नियमीत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अक्षरश: रडू कोसळले.‘वर्षभर अभ्यास करुन आमचा उपयोग काय? कॉपीबहाद्दर पुढे जाणार’ अशा प्रतिक्रिया अश्रूंना वाट मोकळी करून देत प्रामाणिक विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे पदाधिकारी असलेल्या या शाळेतील परीक्षा केंद्रावर राजरोसपणे सामुहीक कॉपीचा सिलसिला पूर्ण पेपर संपेपर्यंत सुरु होता. कॉपी प्रकारावर आळा घालण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले येथील बैठे पथक कोठे गायब होत समजले नाही.
- केंद्राची मान्यता काढून घेण्यापर्यंत गेले होते प्रकरण
वडाळा येथील दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र कॉपीसाठी प्रसिध्द असल्याचे सांगितले जाते. सोलापूर जिल्ह्यातील नव्हे, तर राज्याच्या काही भागातील मुले जादा टक्केवारीसह पास होण्यासाठी वडाळा येथे प्रवेश घेतात. विशेषत्वे, मोठी रक्कम घेऊन त्यांना प्रवेश देत जादा टक्केवारी पडण्यासह पास करुन देण्याची हमी दिली जाते म्हणे. येथील परीक्षा केंद्रावरील कॉपी प्रकरणाच्या तक्रारी आणि त्या संदर्भातील पाठपुरावा राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडे काही वर्षापूर्वी झाला होता,
- तत्कालीन वेळी येथील परीक्षा केंद्रे रद्द करण्यापर्यंत कार्यवाही होत आली होती. मात्र राजकीय दबावामुळे कारवाई झाली नाही. केंद्राची मान्यता काढण्याइतपत सगळे होऊनदेखील या केंद्रावरील कॉप्यांचा प्रकार सुरुच आहे हे विशेष.
No Result
View All Result