पुणे – काव्यरसिकांच्या तुडूंब गर्दीनं खचाखच भरलेलं पुणे जिल्हा डि.सी.सी.बॅंकेच सभागृह ,विविध मान्यवरांच्या हटके विचारकथनात रंगलेला अन् स.१०:४५ ते दु.२:१५ हे तब्बल साडे-तीन तास, नाॅनस्टाॅप चाललेल्या या नितांत सुंदर काव्यप्रकाशन सोहळ्यानं उपस्थितांची मनं जिंकली. मनोरमा स़ोशल फाउंडेशन अंतर्गत मनोरमा साहित्य मंडळी व महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे शाखा पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाच संयोजन मनोरमा पब्लिकेशनकडे होतं.
सर्वस्पर्शी कवीवर्य श्रीकांतजी मोरे यांच्या सिद्धहस्त लेखनकु़ंचल्यातून साकारलेल्या, 1) मनोरम कविता 2) मनमुक्त 3) रंगमंच 4) मन मानेल तसे 5) जीवन सरिता आणि 6) दुनियादारी या वैविध्यपूर्ण कवितांच्या भावखजान्याचा हा प्रकाशन सोहळा नेटके नियोजन व आतिथ्यशीलता यांनी जणू सजलेला असाच होता. साहित्यविश्वात कृतीशील सहभाग असणारे विविध सनदी अधिकारी,साहित्य परिषद पुण्याचे प्रमुख कार्यवाह,व कवी-साहित्यिकांच्या मांदियाळीतन फुललेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ.सदानंद मोरे हे होते .याप्रसंगी श्रीकांतजी मोरे यांनी आपल्या ओघवत्या मनोगतात मन-भावना व संवेदना यांच्या संयोगातून समोर येणा-या काव्यप्रेरणांचे स्त्रोत उलगडले. साहित्याची व काव्यरचनेच्या भावभावनांची सामाजिक गरज यांचा पट प्रभावीरीत्या व ठाशीवपणे मांडणा-या श्रीकांतजींच्या समृध्द मनोगताने हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर गेला.
विषयानुरुपची देखणी मुखपृष्ठे, जाणकार साहित्य परीक्षकांच्या नेमक्या शब्दातला भाविष्कार लाभलेली मलपृष्ठे अन् स्वच्छ व स्पष्ट मुद्रणठशातील हे सर्व काव्यसंग्रह, श्रीकांतजींच्या समृध्द भावरंग-छटातल्या चौफेर अर्थवाही कविता यामुळे देखणे अन् संग्रही बाळगण्याजोगे असेच झाले आहेत. सौ. अस्मिताताई ऍड. सुरेश (बापू) गायकवाड यांच्या वतीने सौ. शोभाताई व श्रीकांतजी मोरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संभाजीराव काकडे यांचे प्रास्ताविक, शोभाताई मोरे यांनी काव्यलेखनाचा खुमासदारपणे घेतलेला धांडोळा, व्यासपिठावरील डाॅ.शेखर गायकवाड, अनिल कवडे, अशोक काकडे, शैलेंद्र पोळ, प्रकाश पायगुडे या मान्यवरांची समयोचित मनोगते, श्वेता हुल्ले यांच नेमकं सूत्रसंचालन अन् डॉ. सदानंद मोरेजींचे साक्षेपी अध्यक्षीय विचारधन, संतोष सुरवसे, अजय मोरे यांच रास्त नियोजन अन सुरेश शहापूरकरांच आभार प्रदर्शन, यांनी सजलेला उत्साही अन् आनंदविभोर ढंगातला हा प्रसन्न भावसोहळा लक्षणीय अन् हटके ठरावा. लज्जतदार स्नेहभोजनाने हा, संस्मरणीय काव्यप्रकाशन सोहळा संपन्न झाला.