मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील या दोघांमध्ये आता राजकीय वाद विकोपास गेला आहे. एकमेकांवर जोरदार टीका करत त्यांनी उघडपणे आव्हान दिले आहे. “माझा नाद केला तर मी कोणाला सोडणार नाही, नरखेडच काय, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तुमचा सातबारा अन् सगळी कुंडली बाहेर काढीन, रेकॉर्डिंगचे काय घेऊन बसलात” असा सज्जड दमच आमदार माने यांनी उमेश पाटील यांना दिला आहे.
राष्ट्रवादीचं गड असलेल्या मोहोळ तालुक्यातच राष्ट्रवादी पक्षात संघर्ष पेटला आहे. उमेश पाटील आणि यशवंत माने यांचा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार विरुध्द राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष असा टोकाचा संघर्ष राष्ट्रवादी अंतर्गतच सुरू झाला आहे. उमेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आमदार यशवंत माने यांच्यावर जाहीरपणे जोरदार टीका केली होती. या टीकेलाच प्रत्युत्तर आमदार माने यांनी दिले आहे. मोहोळ येथील मोरवंची या गावात एका कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या आमदारकीच्या तीन- सव्वा तीन वर्षाच्या कार्यकाळात उमेश पाटील यांच्याबद्दल बरसून टिका केली. माने म्हणाले, ‘उमेश पाटीलांनी जिल्हा कार्याध्यक्षपदाचा वापर करत राष्ट्रवादी एकजूट करण्याऐवाजी, तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच नुसती भांडणे लावून दिली. जिल्हा राष्ट्रवादीमध्ये दुफळी तयार केली, असा आरोप त्यांनी केला.
बाकीच्यांना बाजूला ठेवणाऱ्या उमेश पाटील यांनी मागील सहा वर्षात केलं तरी काय? ज्यांच्याकडे पाया पडत जिल्हा परिषदेची उमेदवारी पदरात पाडून घेतली, त्यांची तरी त्यांनी थोडीतरी जाण ठेवली का? पक्षातील राजन पाटील यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्याचे राजकारण त्यांनी केले. पोलिसांवर दबाव निर्माण करून पक्षाच्या कार्यकर्त्यांनावरच 307 व इतर गुन्हे त्यांनी टाकले. अशा प्रकारचे दबावतंत्र आपण यापुढे चालू देणार नाही.पाटील यांनी आपल्या लायकीत राहावे, असे ही आमदार माने म्हणाले.