नवी दिल्ली : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा आली आहे. याप्रकरणी तुम्ही हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या दोन द्विसदस्यी खंडपीठाकडे सुनावणी होणार होती. सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आलीय. सिंग यांच्यावतीने अॅड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली हा दुर्मीळ प्रकार असल्याचं रोहतगी म्हणाले. त्यावर कोर्टाने हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? याप्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पक्षकार का केलं नाही? असा सवाल करतानाच सर्वोच्च न्यायालयाने रोहतगी यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला.