सोलापूर जिल्ह्यातील 1100 शाळांमधील 5000 शिक्षक ‘जुन्या पेन्शन’च्या संपात सामील झाल्यामुळे शाळा बंद

0
16
  • सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या दोन हजार 795 शाळा असून त्यात नऊ हजार 194 शिक्षक कार्यरत आहेत. आता अंतिम सत्रात जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी बेमुदत संप पुकारल्याने अनेक शाळा शिक्षक नसल्याने बंद ठेवाव्या लागल्या आहेत. पाच हजार शिक्षक संपात असल्याने सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे अकराशे शाळा बंद आहेत.
  • जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 14 लाखांपर्यंत शासकीय व निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. मंगळवारी हा संप सुरू झाला असून राज्य सरकारने समिती नेमून अभ्यास करून 3 महिन्यात निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली आहे. 2005 मध्ये बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू केल्यावर 2032 नंतर राज्यावर अतिरिक्त बोजा वाढणार आहे. त्यामुळे त्यातून मध्यम मार्ग काढण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. पण, कर्मचारी संपावर ठाम आहेत.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन करूनही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. अनेक शासकीय कार्यालये ओस पडली असून सर्वसामान्यांना त्याचा त्रास सोसावा लागत आहे. त्यातच शाळा बंद राहिल्याने चिमुकल्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल अकराशे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कारण, अनेक शिक्षक संपात सहभागी होत आहेत.