सोलापूर – माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत सोलापूर महानगरपालिकेतील विविध कर्मचारी प्रश्नांबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आज सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक पार पडली.
सोलापूर महानगरपालिकेतील २४९ रोजंदारी सेवकांना कायम करणे, १५ वाहनचालकांना कायम सेवेत समाविष्ट करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, महागाई भत्ता तसेच विविध प्रलंबित कर्मचारी प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महानगरपालिकेतील विविध कामगार संघटना व कर्मचारी प्रतिनिधींनी २४९ रोजंदारी सेवक, लाड-पागे सेवक, अनुकंपा नियुक्ती, वाहनचालक तसेच इतर कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सातत्याने मागण्या केल्या आहेत. या सर्व मागण्यांवर प्रशासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करून शासनाकडे प्रभावी प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागप्रमुख व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत ही बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत २४९ रोजंदारी सेवकांना कोल्हापूर व नागपूर महानगरपालिकेच्या धर्तीवर कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्यासंदर्भात शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
तसेच महानगरपालिकेतील १५ वाहनचालकांना कायम सेवेत समाविष्ट करणे, कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता अदा करणे, लाड-पागे सेवकांच्या नियुक्त्या, अनुकंपा नियुक्तीची प्रकरणे, रोजंदारी वाहनचालक, आरसीएच, लिंक वर्कर (आशा वर्कर), नर्सेस, एएनएम, पीएचएन, जीएनएम, बालवाडी सेविका, परिवहन विभाग, शहर क्षयरोग केंद्र, घनकचरा व्यवस्थापन विभाग, वर्ग-४ कर्मचारी तसेच इतर विभागांतील विविध कर्मचारी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय सुधारित आकृतिबंध, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन, निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक लाभ, डॉक्टरांच्या पदनिर्मिती, मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा नियुक्ती, वर्ग-४ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, सरळसेवा भरती आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी आवश्यक माहिती व प्रस्ताव तातडीने सादर करून शासनाकडे पाठवावेत, अशा सूचना महापौरांनी दिल्या.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, “माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बैठकीत कर्मचारी प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे या विषयांना गती मिळाली आहे. २४९ रोजंदारी सेवकांना कोल्हापूर व नागपूर महानगरपालिकेप्रमाणे कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. तसेच त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल. महापालिकेतील १५ वाहनचालकांना कायम सेवेत समाविष्ट करणे, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तसेच इतर न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी महानगरपालिका प्रशासनामार्फत शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल.”
बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, मुख्यलेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव, उपायुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी, नगर अभियंता सारिका आकुलवार, कार्यालय प्रमुख रजाक पेंढारी, सफाई अधीक्षक चराटे, उपअभियंता नीलकंठ मठपती तसेच कामगार संघटनांचे प्रतिनिधी अशोक जानराव, बाली मंडेपु, बापू सदाफुले, जनार्दन शिंदे, अशोक होटकर, दिलावर मन्यार, शेषराव शिरसाट, सायमन गट्टू, रामचंद्र चंदनशिवे, इकबाल तडकल, लिंगराज जटीथोर, डॉ. एस. प्रसाद आदी उपस्थित होते










