दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे ‘वारसा चांदणसुरांचा’ या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती दुर्वांकुर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दीपक कलढोणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावसंगीत आणि अभंगांच्या सुरांची मेजवानी सोलापूरकरांना अनुभवता येणार आहे, गुरुवर्य पद्मश्री पं. जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पं. शौनक अभिषेकी आणि त्यांचे नातू अभेद अभिषेकी हे या मैफलीत गायन सादर करणार आहेत. अभिजात संगीत कलेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विविध संगीतप्रकारांतील निवडक रचनांची सुरेल अनुभूती रसिकांना घेता येणार आहे.
या मैफलीला संवादिनीवर माधव लिमये, तबल्यावर पं. सुभाष कामत आणि कार्तिक स्वामी, मृदंगावर ज्ञानेश्वर दुधाणे, तर टाळांवर दिलीप पोतदार साथसंगत करणार आहेत. नामवंत कलाकारांच्या सहभागामुळे ही मैफल रंगतदार ठरणार आहे. उद्योजक राहुल बुऱ्हाणपुरे आणि वैभव सुरवसे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही मैफल सर्व रसिकांसाठी खुली असून, संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘वारसा चांदणसुरांचा’ या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन दीपक कलढोणे आणि वर्धराज मिर्जी यांनी केले. या पत्रकार परिषदेला राहुल बुऱ्हाणपुरे, वैभव सुरवसे, डॉ. जगदीश पाटील आदी उपस्थित होते.










