सोलापूर – जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक चांगले कलागुण आहेत. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना युवास्पंदन सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येकवर्षी व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचेे प्रतिपादन कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने आयोजित विद्यापीठ परिसरातील अधिविभागांचा युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे, विद्यार्थी विकास विभागाचे डॉ. केदारनाथ काळवणे, समन्वयक डॉ. विकास कडू आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवात रांगोळी, पोस्टर मेकिंग, स्थळ चित्रण, मेहंदी, स्पॉट फोटोग्राफी, मराठी, हिंन्दी, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, सुगम गायन, लघुनाटिका, थिम डान्स, लोकनृत्य, फनफेअर, फॅशन शो आदी कलाप्रकारांचा समावेश होता. युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवात सामाजिक शास्त्रे संकुलाने सर्वाधिक पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक पदार्थ विज्ञान संकुल आणि तृतीय क्रमांक रसायनशास्त्र संकुलाने मिळवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. यावेळी विद्यापीठातील विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.