सोलापूर, दि. 8- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा एकोणिसावा युवा महोत्सव हा अतिशय दर्जेदार होण्यासाठी सांस्कृतिक प्रमुखांनी तयारीला लागावे. तसेच विद्यार्थ्यांकडून गुणवत्ताभिमुख अभिनयाचे सादरीकरण करण्यासाठी जोरदार सराव करून घ्यावे, असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी केले.
शुक्रवारी, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग आणि दयानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने संलग्नित महाविद्यालयातील संस्कृतिक प्रमुखांसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू डॉ. कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. बी. एच. दामजी हे होते. यावेळी व्यासपीठावर तज्ञ प्रशिक्षक डॉ. संजय देवळणकर-पाटील, डॉ. शिरीष आंबेकर, डॉ. राजेंद्र दूरकर आणि भक्ती झळकी यांची उपस्थिती होती. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले.
प्र-कुलगुरू डॉ. कांबळे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या अनुषंगाने विद्यापीठाचा युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा देणारा आणि व्यक्तिमत्व विकास घडविणारा असतो. त्यामुळे त्यांना व्यासपीठ देणे ही विद्यापीठ व महाविद्यालयाची जबाबदारी आहे. युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक प्रमुखांनी शिस्त, संस्काराचे धडे द्यावे. महोत्सवाला गालबोट लागू नये, याविषयी काळजी घेण्यात यावी. चांगल्या प्रकारे तयारी करूनच महोत्सवात उतरावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
डॉ. काळवणे यांनी यावेळी यंदाचा युवा महोत्सव दि. 10 ते 13 ऑक्टोबर 2023 दरम्यान स्वेरी कॉलेज पंढरपूर येथे होणार असल्याचे सांगून यंदा महोत्सवात 33 कलाप्रकारांचे सादरीकरण होणार असल्याचे सांगितले. यामध्ये पाश्चात समूह गायन, गायन, वाद्य संगीत आणि मेंदी या कलाप्रकारांचे समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तज्ञ प्रशिक्षकांनी नृत्य, नाट्य, संगीत आणि ललित विभागाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. वाड्मय गटाविषयी डॉ. यशपाल खेडकर यांनी मार्गदर्शन केले. कुलसचिव योगिनी घारे यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ. आर. ए. रणवरे यांनी मानले.