शिवाजी सुरवसे / सोलापूर : ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’… अशी जाहिरात आपण दरवर्षी ऐकतोच… शिवाय पोलीस स्टेशनमध्ये ‘मोस्ट वॉन्टेड’ अशा आरोपींचे फोटो लटकविले असतात ते देखील पाहतो.. एवढेच नव्हे तर ‘हरवले आणि सापडले’ अशा व्यक्तींचे फोटो देखील पेपरमधून पाहतो… आता आपल्या गुरुजींचे देखील फोटो विद्यार्थ्यांना भिंतीवर लटकविलेले दररोज पाहायला मिळणार आहेत. कोण म्हणतो शिक्षकांना भरपूर पगार आहे.. काहीजण म्हणतात शिक्षक शाळेतच येत नाही तर काही ठिकाणी शिक्षकांनी शिकवण्यासाठी काही पोटशिक्षक देखील नेमले आहेत. अशा अफवा.. वावड्या किंवा वस्तुस्थिती आपण नेहमीच पाहतो ऐकतो. म्हणूनच की काय महाराष्ट्र शासनाने आदेश काढून ‘आपले गुरुजी’ या मोहिमेमध्ये शाळेत दर्शनी भागात शिक्षकाचे नाव आणि त्या शिक्षकाचा ए फोर साईटचा फोटो लावण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये आता आपले शिक्षक विद्यार्थ्यांना दररोज फोटो रूपातून देखील पाहता येणार आहेत. शौचालय मोजण्याच्या कामापासून ते इलेक्शन ड्युटी करण्याच्या विविध प्रकारच्या कामांपर्यंत शिक्षकांना नेहमीच जुंपले जाते. त्यामुळे अशा अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी अशी मागणी होत असतानाच शिक्षक दिन जवळ आला असताना शिक्षकांवर अविश्वास दाखवण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे म्हणून आपले गुरुजी अंतर्गत फोटो लावण्याचा हा आदेश रद्द करण्याची मागणी शिक्षक संघटना मार्फत जोर धरू लागली आहे