सोलापूर, निरोगी मन व शरीरासाठी योग आवश्यक असून नियमित योगा करणे महत्त्वाचे आहे. सदृढ आरोग्यासाठी योग हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला पाहिजे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांनी व्यक्त केले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दीक्षांत प्रांगणात जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांच्या हस्ते वृक्ष रोपाला पाणी घालून योग प्रात्यक्षिक कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी उपस्थित सर्वांना योगाच्या प्रकाराविषयी माहिती देत सर्वांकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी योगाची विविध आसने करत सर्वांनी योगाभ्यास केला. यामध्ये विविध संकुलांचे संचालक, शिक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.