मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी
यांचे हस्ते साडेसात लाखाचे साहित्य वाटप
- सोलापूर – गावातील नागरिकांनी आपल्या शाळेच्या व गावाच्या विकासासाठी एक दिलाने काम केल्यास निश्चितच गावचे नाव लौकिक होईल असे, मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
- जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगर (ता. अक्कलकोट) येथे कै. भैय्या साहेब उर्फ डॉ. प. गो. वळसंगकर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ शाळा खोल्याना झालेली रंगरंगोटी व पुणे येथील आर एम. डी. ग्रुपच्या धारीवाल ट्रस्टकडून मिळालेल्या कोल्ड वॉटर प्युरीफायर व आर. सी. एफ. कंपनी लि. मुंबई (भारत सरकार) यांचेकडून ७ लाख ६० हजार किमतीचे ५० इंची सात स्मार्ट रंगीत टीव्ही, दहा कपाट, दहा खुर्च्या व दहा टेबल इत्यादी साधनांमधून साकार झालेल्या डिजीटल शाळा वर्ग खोल्यांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
- डॉ. शिरीषजी वळसंगकर यांचे उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा झाला.या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्व डिजीटल शाळा खोल्यांचा उद्घाटन सोहळा पार पडला. तसेच उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते माझी वसुंधरा अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम झाले. शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या परसबागेचा शुभारंभ सीईओ स्वामी यांच्या हस्ते झाले.
- “बेटी बचाव व बेटी पढाओ” या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांच्या संकल्पनेतून एक किंवा दोन मुलींवर ऑपरेशन केलेल्या निलम्मा सातप्पा पाटील, सावित्री शरणप्पा पाटील, मंजुळा विजयकुमार फुलारी या मातांचा सत्कार सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी गुणवत्ता शोधमध्ये जिल्हा स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते झाले.
- गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शाळेचा विकास म्हणजे गावचा विकास होय. शाळेने विविध उपक्रम घेतले याची दखल खुडे यांनी घेत समाधान व्यक्त केले. शिरीष वळसंगकर यांनी मनोगत व्यक्त करताना शाळा सुशोभीकरण आणि विविध कार्यक्रमबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पंचायत समिती अक्कलकोटच्या गट शिक्षण अधिकारी कुदसिया शेख यांनी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांनी शाळा सुशोभीकरणासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
- कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना शाळेने केलेल्या विविध कार्यांचा कौतुक करत एक वेगळीच शाबासकीची थाप दिली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांनी शाळेसाठी घेतलेल्या अतोनात कष्टांचे चीज झाले हे आज शाळेचा सर्व परिसर पाहिल्यानंतर दिसून आले. तसेच शाळेमध्ये सुरू असलेल्या दशसुत्री कार्यक्रमाचा उल्लेख मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले.
सलगर गावच्या सरपंच ज्योती डोंगराजे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानताना आपण ज्या बाबींबाबत आग्रही आहात त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याची ग्वाही समारोप प्रसंगी दिली. या कार्यक्रमासाठी डॉ. वळसंगकर, सचिन खुडे, सुवर्णा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत बिराजदार व इतर सदस्य, पोलिस पाटील श्रीशैल बिराजदार आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.