सोलापूर, दि. 20- कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक जीवनात वावरताना महिलांनी आपल्या सुरक्षिततेविषयी काळजी घ्यावी. कोणाचेही कसलीही भीड ठेवू नये. अन्याय सहन न करता त्यास आपल्या प्रतिकारशक्तीने लढण्यास शिकावे व कायद्याने साक्षर बनावे, असे आवाहन सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी केले.
शुक्रवारी, महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महिला कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती’ या विषयावर आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचलिका डॉ. नलिनी टेंभेकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कक्षाच्या उपाध्यक्षा डॉ. ज्योती माशाळे यांनी केले.
अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या की, महिलांच्या सुरक्षिततेविषयी विशाखा समितीच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी सर्वत्र होणे आवश्यक आहे. महिला या सोशिक व मल्टीटास्किंग असतात. मात्र महिलांनी आपणास जे योग्य वाटत नाही, याविषयी बिनधास्तपणे बोलायला पाहिजे व त्याविषयी आवाज उठवायला हवे. महिलांमध्ये आत्मविश्वास असायला हवे. त्याचबरोबर महिलांविषयी पुरुषांची देखील मानसिकता बदलायला हवी. महिलांचा योग्य सन्मान ठेवणे. त्यांच्याशी चांगली वर्तवणूक ठेवणे, हे देखील महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या. “सिसकती आरजुओं की बग़ावत लिख न पाऊंगी, कि शफ़्फ़ाफ़ी की मैं तीरा हकीकत लिख न पाउंगी..” ही शाहीर देखील त्यांनी यावेळी सादर केली.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले, आपली जबाबदारी काय आहे, याची जाणीव करून देणे व त्याविषयी वारंवार आठवण करून देणे, यासाठीच आज “महिलांची सुरक्षितता” या विषयावर शासनाच्या सूचनेप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी व सार्वजनिक जीवनात महिलांचा सन्मान ठेवणे व त्यांच्या सुरक्षिततेविषयी काळजी घेणे, हे पुरुषांचे कर्तव्य आहे. प्रत्येकांनी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करणे देखील आपले कर्तव्य असल्याचे कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले. विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी प्राचार्यांना केले.
या कार्यशाळेत उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचलिका डॉ. नलिनी टेंभेकर, विद्यापीठाचे कायदा अधिकारी जावेद खैरदी, उद्योजिका चंद्रिका चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी मानले.
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ‘महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्ती’ या विषयावर आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, सहसंचलिका डॉ. नलिनी टेंभेकर.