सोलापूर, दि. 5 मार्च- शासनाकडून येणार्या नवनव्या योजनांची आपल्या गावात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महिला सरपंचांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या सरपंचपदाच्या मिळालेल्या संधीतून गावांचा विकास साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. दरम्यान, या सरपंचांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी प्रयत्न केला तर काहीही अशक्य नाही, तुम्ही लढातर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असाही सल्ला सीईओ आव्हाळे यांनी दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या संकल्पनेतून आज दि. 5 मार्च रोजी महिला सरपंच कार्यशाळा येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जिल्हास्तरीय खाते प्रमुख इशाधीन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अमोल जाधव, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी सदर कार्यशाळेस उपस्थित होते.
तसेच सदर कार्यशाळेवेळी फलटनचे ग्रामसेवक प्रकाश कळसकर, यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मासिक सभा ग्रामसभा कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. निवृत्त लेखाधिकारी झहीर सय्यद यांनी ग्रामपंचायत लेखा संहिता अधिनियम 2011, व्याख्याते शिवाजी पवार यांनी यशदा राज्य शासनाच्या योजना, उपक्रम कशा पध्दतीने राबविते याबाबत माहिती दिली. मोटिवेशनल स्पीकर सुभाष रणदिवे यांनी मानवी दृष्टिकोन, अॅड. सुवर्णा कोकरे यांनी पोकसा कायदा बाबत माहिती दिली. धाराशिव येथील संवाद तज्ज्ञ रमाकांत गायकवाड यांनी महिला बचत गट व उमेद अभियान तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी शाश्वत विकासाची उद्दिष्टे व भूमिका याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेसाठी जिल्ह्यातून 585 महिला सरपंच कार्यशाळेसाठी उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांनी ग्रामीण विकासाचा गाडा, त्यांच्या येणार्या अडीअडचणींचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले. यावेळी सुभाष देशमुख यांनी महिला सरपंचांना मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.