No Result
View All Result
- सोलापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे एक वर्ष आधीपासूनच जोरदारपणे वाहू लागले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवरून येथे खुद्द पक्षातच पसंती आणि नापसंतीच्या मोठ्या वावड्या उठल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे राजकीय वारसदार तसेच, विधानसभेला हॅट्रिक साधणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी खुद्द पक्षातूनच तीव्र विरोध होत आहे, दुसरीकडे, सुशीलकुमार शिंदे यांनीच या वेळेची लोकसभा लढवावी, यासाठी पक्षातूनच कार्यकर्त्यांचा दबाव वाढताना दिसत आहे.
- अशातच येथील राजकारणाला वेगळे वलय, अस्तित्व असलेल्या विकासाभिमुख आमदार प्रणिती शिंदे यांच्या हाती ‘कमळ’ देऊन सोलापूर लोकभेच्या या मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी भाजपाकडून वेगळ्या राजकीय डावपेचाची शक्यता वर्तवली जात आहे. प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीला पक्षामधील होत असलेला विरोध लक्षात घेता, भाकरी फिरवून याच मुद्द्याच्या आधारे प्रणिती शिंदे यांना भाजपात घेण्याचा ‘मास्टरस्ट्रोक’च्या हालचाली या पक्षात होत असल्याची चर्चा होत आहे.
- विशेषकरून, वयाची ऐंशी गाठणाऱ्या सुशीलकुमारांनी सोलापूर लोकसभेची जागा स्वत: अडवून न ठेवता, ती तरुणाईसाठी मोकळी करून द्यावी. या जागेवर त्यांची राजकीय वारसदार कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपची उमेदवारी घेण्यास भाग पाडून येथे ‘विकासाचे कमळ’ फुलवावे, अशी धारणा आणि विचारप्रवाह भाजपाच्या गोटात आहे. तसे प्रयत्नही भाजपाच्या वर्तुळात सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
- आमदार प्रणिती शिंदे यांचा भाजप प्रवेश होण्याच्या दृष्टीने त्यांचे मन वळवण्यासाठी तसेच मध्यस्ती करण्यासाठी कोणता ‘वजनदार’ चेहरा चालेल, याची चाचणी भाजपातील स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून चालू आहे. वास्तविक काँग्रेस हा आमचा ‘श्वास’ आणि ‘ध्यास’ आहे, आपण काँग्रेस पक्ष कधीच सोडणार नाही, आपला भाजप प्रवेश कधीच शक्य नाही. उलट या पक्षाकडूनच तशा वावड्या उठवल्या जात आहेत, असे स्पष्टीकरण प्रणिती शिंदे यांनी यापूर्वीच दिले आहे.
- आरक्षित सोलापूर लोकसभेसाठी भाजपाच्या विजयाची हॅट्रिक साधताना आमदार प्रणिती शिंदे यांच्या इतक्या सक्षम तुलनात्मक चेहरा, सर्वच आघाड्यांवर भाजप प्रवेशासाठी प्रणिती शिंदे यांच्यासाठीच प्रयत्न व्हावेत, अशी चर्चा स्थानिक नेतृत्वांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्याकडे केल्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाला खुद्द त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विरोध केला हे गंभीर मानले जात आहे. त्याचाच फायदा प्रणिती शिंदे यांना भाजपात घेऊन सोलापूर लोकसभेची उमेदवारी त्यांना देता येईल, का याचेही आडाखे भाजपात बांधले जात आहेत. सध्या जरी अशा शक्यता पडताळून पाहिल्या जात असल्या तरी राजकारणात कधीही काही होऊ शकते, या शक्यतेबाबत चर्चेचे वादळ घोंगावत आहे.
- धर्मनिरपेक्षतेसंदर्भात बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी यापूर्वी भगव्या दहशतवादावर भाष्य केले आहे, त्यांचे हे भाष्य आमदार प्रणिती शिंदे यांच्या जर भाजपा प्रवेशाचा विचार होऊ लागला तर ते अडचणीचे ठरू शकते. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुशीलकुमार शिंदे यांची भगव्या दहशतवादाची वक्तव्य पटलेली नव्हती, त्यांच्या या वक्तव्यांना संघाच्या कार्यकर्त्यांचा याला जोरदार आक्षेप राहिला. खुद्द आमदार प्रणिती शिंदे यांनीदेखील आपल्या पित्याच्या भगव्या दहशतवादाचे समर्थन केले आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजपा प्रवेशाची वाट अत्यंत खडतर आहे, अशी ही चर्चा भाजपाच्या गोटात आहेत. सुशीलकुमार शिंदे यांची ती वक्तव्य जुनी पुराणातली वांगी असे समजून, प्रणिती शिंदे यांच्या रूपाने सगळ्यात सक्षम नेतृत्व भाजपाला सोलापुरात मिळू शकते, असा सकारात्मक विचार झाल्यास प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाच्या वाटेतील काटे दूर होऊ शकतात, असेही बोलले जात आहे.
No Result
View All Result