नवी दिल्ली : भारत सरकारने सरकारी अधिकाऱ्यांसाठी Whatsapp चे खास भारतीय व्हर्जन आणले आहे. गेल्या वर्षी सरकारने असे अॅप तयार होत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर नुकतेच हे अॅप सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आले आहे. आता हे अॅप सर्वसामान्यांनाही वापरता येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रायव्हसीच्या दृष्टीने Sandes अॅप फायदेशीर असून व्हॉट्स अॅपला उत्तम पर्याय ठरेल. Sandes अॅप iOS आणि अँड्रॉईड अशा दोन्ही प्लेटफॉर्मवर काम करते. हे अॅप ऑडिओ आणि डेटा सपोर्ट करते. हे एक आधुनिक चॅटिंग अॅप आहे. या अॅपचे बॅकएंड नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर हँडल करते जे आयटी मंत्रालयाअंतर्गत येते.
Sandes अॅप असे या इन्स्टंट मेसेजिंग अॅपचे नाव आहे. हे अॅप Whatsapp सारखं चॅटिंगचं देसी व्हर्जन आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या अॅपचा वापर करण्यास आता सुरुवात केली आहे. हे अॅप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर ने बनवलं आहे. केंद्र सरकारने हे मेड इन इंडिया अॅप आत्मनिर्भर भारत अंतर्गत सादर केले आहे.
Whatsapp ला पर्याय?
नव्या गोपनीयता धोरणामुळे Whatsapp वर सध्या जोरदार टीका सुरु आहे. अनेक युजर्सनी आता Whatsapp चा वापर सोडून इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्सकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. अनेक युजर्स Whatsapp सोडून टेलिग्राम किंवा सिग्नल या अॅपवर शिफ्ट होत आहेत. अशातच भारत सरकारने बनवलेलं Sandes अॅप हे देखील युजर्ससाठी उत्तम पर्याय म्हणून समोर आलं आहे.