नवी दिल्ली : हमाससोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी मंगळवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. या कठीण काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी नेतन्याहू यांना दिले.
पीएम मोदींनी सोशल मीडिया X वर पोस्ट करत लिहिले की, “मला फोन करून परिस्थितीबद्दल माहिती दिल्याबद्दल मी पंतप्रधान नेतन्याहूंचे आभार मानतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो.
पॅलेस्टाईनमधील कट्टरतावादी संघटना हमासने शनिवार, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ला चढवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रॉकेट हल्ल्याला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर म्हटले की, इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने धक्का बसला आहे. मृतांच्या कुटुंबीयांबाबत शोक व्यक्त करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.