पाणलोट विकास घटक 2.0 योजना सोलापूर जिल्ह्यातील माढा, कुर्डुवाडी, मंगळवेढा व सांगोला या तालुक्यात राबविली जाणार
सोलापूर : केंद्र शासनाने माहे जानेवारी 2025 पासून राज्यातील 30 जिल्ह्यात पाणलोट गावातील पाणलोट यात्रा सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील माढा, कुर्डुवाडी, मंगळवेढा व सांगोला या चार तालुक्यात त उपक्रम राबवण्यात येणार आहे तरी जलसंधारण विभागाच्या सर्व संबंधित यंत्रणांनी उपरोक्त तालुक्यातील प्रत्येक गावात पाणलोट चळवळ निर्माण करण्यासाठी प्रबोधन मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
या यात्रेचे नियोजन करण्याकरिता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे अध्यक्षतेत जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. यावेळी सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमोल जाधव, जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद एस.एस.पारशे, उपविभागीय अधिकारी भीमा पाटबंधारे विभाग एस.डी.हलकुडे, प्रकल्प संचालक नेहरू युवा केंद्र अनिल हिंगे, उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वाय.चौधरी, उपकार्यकारी अधिकारी सोलापूर पाटबंधारे विभाग ओ.बी.थंबद, प्रांत अधिकारी माढा श्रीमती पी.व्ही. आंबेकर तसेच जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी व योजनेचे सर्व प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की, सर्व यंत्रणांना एकत्र येऊन गावोगावी पाणलोट चळवळ निर्माण व्हावी, याअनुषंगाने नवीन मृद व जलसंधारण कामांचे भूमिपूजन करणे, पाणलोट कामांवर श्रमदान करणे, पुर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण करणे, पाणलोट योध्दे निवडणे इत्यादी कामांचे सुक्ष्म नियोजन करून या उपक्रमांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, बचत गटातील महिला, स्वयंसेवी संस्था व शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे सांगितले.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-
पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना सोलापूर जिल्ह्यातील माढा, कुर्डुवाडी, मंगळवेढा व सांगोला या तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेविषयी स्थानिक समुदायामध्ये जागरूकता निर्माण करून जनजागृती करण्यासाठी तसेच लोकसहभागातून योजनेच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी केंद्र शासनामार्फत जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यातील 140 प्रकल्प क्षेत्रातील 30 जिल्ह्यामधील पाणलोट गावांमध्ये “पाणलोट यात्रा” सुरू करण्यात येणार आहे. यात्रेचे आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात येणार असून त्याच्या कार्यक्रम अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा सहभाग नोंदविण्यात येणार आहे.