श्री शिवछत्रपतींचे मावळे म्हणजे हिंदुत्वाचे प्रतीक
सोलापूर : श्री शिवछत्रपतींनी घालून दिलेल्या देव, देश, धर्माच्या मार्गावर मावळ्यांनी जोमाने वाटचाल केली. श्री शिवछत्रपतींचे मावळे म्हणजे हिंदुत्वाचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन छत्रपती श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी केले.
३५० व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाउंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेच्या पाचव्या दिवशी सोमवारी प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी मार्गदर्शन केले. ‘शिवशौर्य’ या विषयावर बोलताना त्यांनी सुरतेवर स्वारी, प्रथम आरमार स्वारी, पुरंदरचा वेढा व तह आदींवर विवेचन केले.
प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी म्हणाले, जन्माने हिंदू असूनही धर्माचा अभिमान नसणारे बुजगविण्यासारखे आहेत. प्रत्येक हिंदूच्या अंत: करणात छत्रपती श्री शिवाजी महाराजांची चेतना जागृत करण्याची आवश्यकता आहे. श्री शिवछत्रपतींची प्रेरणा निरंतर आपल्या हृदयात विराजमान झाल्यास हिंदू समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस या जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही असेही प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी यांनी सांगितले. सी. ए. राजगोपाल मिणीयार यांनी प्रास्ताविक तर गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
आज ‘ शिवचातुर्य ‘ या विषयावर मार्गदर्शन
छत्रपती श्री शिवाजी महाराज कथेमध्ये मंगळवारी दुपारी ४ ते ७.३० दरम्यान प. पू. स्वामी गोविंद देव गिरिजी ‘ शिवचातुर्य ‘ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सोलापूरकरांनी या कथेस उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.