चंदिगड : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने नुकतेच कुस्तीला रामराम करत थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. विनेश फोगाटसोबतच कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेदेखील काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेतले आहे. विनेशच्या या निर्णयानंतर आता ती कुस्तीच्या मैदानातून थेट राजकारणाच्या मैदानात दंगल करणार असं म्हटलं जातंय. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच काँग्रेसने तिला हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत उतरवलं आहे. तिला काँग्रेसने जुलाना या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.
राहुल गांधी यांची घेतली होती भेट
नुकतेच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक हुकल्यामुळे विनेश फोगाटप्रती देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. 100 ग्रॅम वजन जास्त झाल्यामुळे तिला बद ठरवण्यात आले. त्यानंतर लगेच विनेशने गुस्तीपासून रामराम घेतला. या निर्णयानंतर आता विनेश नेमकं काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारतात परतल्यानंतर विनेशने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यावेळी विनेशसोबत बजरंग पुनियादेखील होता. त्यानंतर 6 सप्टेंबर रोजी विनेशने काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश केला आहे.
जुलाना येथून विनेशला तिकीट
काँग्रेस प्रवेशानंतर विनेशला काँग्रेसने मोठं बक्षीस दिलं आहे. विनेश फोगाटला काँग्रेसने थेट हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तिला काँग्रेसने जुलाना या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. जुलाना मतदारसंघातील खेडा बख्ता हे विनेश फोगाटचे सासर आहे. आता विनेश फोगाट राजकारणाच्या मैदानात उतरली आहे.