आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले. 1980 मध्ये आहत नावाच्या अल्बमच्या मार्फत त्यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली. या अल्बमने त्यांना व्यावसायिक यशाचे दरवाजे खुले झाले. पंकज उधास यांचे मुकरार, तरन्नम, मेहफिल आदी गाणी चांगलीच लोकप्रिय झाली.
गझल गायक म्हणून यश मिळवल्यानंतर, महेश भट्ट यांच्या नाम या चित्रपटात पंकज उधास दिसले होते. चिठ्ठी आयी है या गाण्यातून पंकज उधास घराघरात पोहचले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. जगभरातील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. 2006 मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.