पुणे : स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी या दुर्मिळ आजाराने ग्रस्त पिंपरी-चिंचवडच्या वेदिका शिंदे या चिमुकलीला १६ कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लसही दिली गेली. मात्र, ती जीवनाची लढाई हरली. तिचा रविवारी रात्री मृत्यू झाला. मुलीचा जीव वाचावा यासाठी तिच्या आई-वडिलांनी आवाहन केल्यानंतर अनेक दानशूरांनी भरभरून मदत केल्याने अमेरिकेतून झोलगेन्स्मा लस मागवून पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तिला ही लस देण्यात आली. त्यानंतर ती बरी होईल, अशी आशा सर्वांनाच होती. मात्र रविवारी तिचा मृत्यू झाला. वेदिकावर उपचार करणारे डॉक्टरही तिच्या मृत्यूने हळहळले आहेत.