सोलापूर महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘वात्सल्य रोटरी वूमन मिल्क बँक’ या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या औपचारिक कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात पार पडले. स्तनदुध दानाबद्दल जनजागृती करणे, गरजू नवजात बालकांना सुरक्षित व प्रमाणित दूध उपलब्ध करून देणे आणि मातृत्व व बालसंगोपनातील आरोग्यविषयक भक्कम पायाभरणी करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे या कार्यक्रमात स्पष्ट झाले.कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे स्वागत संतोष सपकाळ, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ यांनी केले. उपायुक्त आशिष लोकरे यांचे स्वागत युगंधर जिंदे यांनी केले.
सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. राखी माने यांचे स्वागत आशावरी श्रॉप यांनी केले.डॉ. शिरशेट्टी यांचा सत्कार डॉ. निहार बुरटे यांनी केला. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रकल्प प्रमुख डॉ. निहार बुरटे यांनी सादर करताना वूमन मिल्क बँकेची संकल्पना, कार्यपद्धती, सुरक्षितता निकष, दूध संकलन व प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. सोलापूरसारख्या मोठ्या शहरी भागात अशा सुविधेची नितांत गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष सपकाळ यांनी या उपक्रमामागील हेतू स्पष्ट करताना सांगितले की, “अनेक आईंच्या आरोग्यविषयक अडचणींमुळे किंवा प्रसुतीतील गुंतागुंतीमुळे नवजात बालकांना स्तनदूध मिळत नाही. अशावेळी प्रमाणित, सुरक्षित आणि पोषक दुधाची उपलब्धता हा जीव वाचविणारा घटक ठरतो. रोटरी क्लबचा हा प्रकल्प समाजाच्या आरोग्यवृद्धीसाठी मोठे योगदान देईल आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत “सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्यसेवेत वूमन मिल्क बँक एक अत्यंत महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचा समारोप . युगंधर जिंदे यांनी आभार प्रदर्शन करून केला. सर्व वैद्यकीय अधिकारी, रोटरी क्लब सदस्य तसेच उपस्थित नागरिकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.ही वूमन मिल्क बँक सोलापूर शहरातील बालआरोग्य सुधारण्यासाठी आणि मातृत्वाला बळ देण्यासाठी एक महत्त्वाची आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त पाऊल असल्याचे कार्यक्रमात सर्वांनी एकमुखाने व्यक्त केले.यावेळी डॉ लता पाटील व दाराशा नागरी आरोग्य केंद्र येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.

