येस न्युज मराठी नेटवर्क : गुढीपाडवा मेळाव्यानंतर झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना आपली मशिदीवरील भोंग्यांबाबतची भूमिका समजावून सांगितली. तसंच राज यांनी सार्वजनिकरित्या आक्षेप व्यक्त केल्यावरून वसंत मोरे यांच्यावर नाराजीही व्यक्त केली. राज ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर आपण पूर्णपणे समाधानी झालो असल्याची प्रतिक्रिया मोरे यांनी दिली आहे. या भेटीनंतर त्यांनी एक खास ट्वीटही केलं आहे.
‘मी माझ्या साहेबांसोबत आहे. आयुष्यात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही’ असं ट्वीट वसंत मोरे यांनी केलं आहे. वसंत मोरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये ‘जय श्रीराम’चा नाराही दिला आहे.
नसेचं हिंदुत्व आणि वसंत मोरे
राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या भाषणातून आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचं आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे मुस्लीम समाजात नाराजी पसरली आणि याचा परिणाम मनसेतील मुस्लीम पदाधिकाऱ्यांवरही झाला. आमच्या भागातील नागरिक जाब विचारू लागले असल्याचं सांगत पुण्यातील काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर वसंत मोरे यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेशी असहमती दाखवत माझ्या प्रभागात भोंगे लावणार नसल्याचं स्पष्ट केलं.