मुंबई : मनसेतून पुणे मतदारसंघासाठी लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, यासाठी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढलेले तसेच या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले वसंत मोरे यांनी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच प्रवेश केला. अलीकडेच वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. मुंबईत मातोश्रीवर येऊन वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
वसंत मोरे म्हणाले की, सर्वप्रथम आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आयुष्यात १९९२ मध्ये कात्रज परिसरात पहिल्यांदा शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो. १६ वर्षांचा असताना कात्रज येथे शिवसेनेची शाखा स्थापन झाली, परंतु, वयाची १८ वर्षे पूर्ण होत नसल्यामुळे शाखा प्रमुख होता येत नव्हते. १९९२ मध्ये १२ वी पास झालो आणि पहिला शाखा प्रमुख झालो. तेव्हापासून वयाच्या ३१ व्या वर्षापर्यंत उपविभाग प्रमुखापर्यंत गेलो. त्यानंतर मनसे पक्षात प्रवेश केला. अनेक जण म्हणतात की, तात्यांचा शिवसेनेत प्रवेश आहे. परंतु, हा माझा प्रवेश नाही, तर मी परत एकदा शिवसेनेत आलो आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली.