सोलापूर :-जिल्ह्यात विविध विकासाच्या कामासाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे. कामांना गती देऊन कामे दर्जेदार करावीत, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
नियोजन भवन येथे जिल्ह्यातील विकास कामांचा तसेच विभागांचा आढावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, मनोज ठाकरे , व्ही.एच माळी यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री भरणे बोलताना म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचे पुरवठ्याबाबत योग्य नियोजन करावे. उन्हाळ्यात कोणत्याही गावांना पाण्याची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. ज्या गावांनी टँकरची मागणी केली आहे त्यांना तत्काळ टँकर उपलब्ध करून द्यावेत. त्याबाबत तत्काळ नियोजन करावे.
यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लसीकरणाची माहिती घेतली. तसेच १२ ते १५ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.कंत्राटी डॉक्टरांचे वेतन अदा करण्याबाबत तत्काळ निर्णय घेण्यात येईल, असेही पालकमंत्री भरणे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेऊन अडचणी जाणून घेतल्या. तसेच आवश्यक त्या सूचनाही त्यांनी केल्या. बैठकीत वनविभाग, महावितरण, सुरक्षाविषयक आढावा घेण्यात आला.