वडगाव नगराचे पथसंचलन विजयादशमीला सकाळी संपन्न झाले. शिवसृष्टी प्रांगणातून गणवेशधारी स्वयंसेवक सकाळी ७.३० वाजता संचलनाकरिता मार्गस्थ झाले. शिवसृष्टी ते सिंहगड महाविद्यालय संकुल, काही सोसायटी परिसर असे सुमारे ५० मिनिटांचे संचलन झाले. घोषाच्या निनादात निघालेल्या संचलनातील संघ स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करण्यास रस्त्याच्या दुतर्फा अनेक नागरिक, माता, भगिनी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपाच्या वडगाव आरोग्य कोठीचे मुकादम अशोकराव साठे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह धनंजय घाटे हे उपस्थित होते. संचलनात एकूण २८७ स्वयंसेवक सहभागी झाले होते. विजयादशमी मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली असून संघाच्या एकूण सहा उत्सवापैकी विजयादशमी हा एक उत्सव आहे. दरवर्षी विजयादशमीला पथ संचलन करण्यात येते. यावर्षी पुणे शहरात एकूण ५८ पथ संचलन प्रस्तावित आहेत.
नगर कार्यवाह राजेंद्र पुराणिक यांनी पोलिस, मनपा, शिवसृष्टी व्यवस्थापन, स्थानिक नागरिक यांनी केलेल्या सहकार्यासाठी त्यांचे आभार मानले.