सोलापूर सोशल फाऊडेशनच्या वतीने श्रावण सोमवार निमित्त वृक्षारोपण, श्रींची महापूजा
दक्षिण सोलापूर (तालुका प्रतिनिधी) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील प्रभूलिंग यात्रा कमिटीच्या वतीने राबविलेल्या विकासाच्या संकल्पना जिल्हाभर राबविणार असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.
सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सोलापूर जिल्हा पर्यटन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुभाष देशमुख यांनी वडापूर गावाला भेट दिली. प्रारंभी येथील बालसंस्कार केंद्राची पाहणी केली. पालखी तळावर वृक्षारोपण, शिवलिंगाचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रभूलिंग देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब झांबरे- पाटील, मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, परमानंद देव ट्रस्टचे अध्यक्ष पंडित पुजारी, गणपती पुजारी, बिपिन पाटील, नामदेव गायकवाड, प्रमोद गुंड आदी उपस्थित होते.
प्रस्ताविकात अरुण पाटील यांनी वडापूर गावच्या विकासाबाबत, प्रभुलिंग मंदिर परिसरात राबवलेली विकास कामे, प्रस्तावित कामे याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रत्येक कामासाठी पैशाचीच गरज असते असे नाही तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. लोकसहभाग महत्त्वाचा असतो, त्याग करण्याची ही मानसिकता पाहिजे. शिवाय या गावात कोणताही निर्णय सर्वानुमते घेतला जातो. विकास कामात राजकारण केले जात नाही. या गोष्टी मला वडापूर ग्रामस्थांमध्ये पहावयास मिळाल्या. प्रभुलिंग मंदिर परिसरात विकासासाठी गावच्या लेकींना सामावून घेतले ही संकल्पना वेगळी वाटते. विकासासाठी आपण ज्या संकल्पना राबविल्या आहेत त्या आता जिल्हाभर राबविणार आहे. प्रभुलिंग मंदिर परिसर धार्मिक पर्यटन स्थळासाठी अतिशय उत्कृष्ट आहे. त्याचे आपण मार्केटिंग करावे, असे आवाहन त्यांनी केले.सूत्रसंचालन डॉक्टर महेश पाटील यांनी केले.
बालकीर्तनकारांचे गाव वडापूर
वडापूरच्या बालसंस्कार केंद्रामध्ये सात बाल कीर्तनकार, उत्कृष्ट गायक, तबलावादक आहेत. जर का यांचा प्रसार व प्रचार जिल्हाभर केला तर वडापूर हे बाल कीर्तनकारांचे गाव म्हणून ओळखले जाईल, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले.

