उध्दव ठाकरे यांची शिवसेनापक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारीला संपली आहे. तसेच या शिंदे गटानं मुख्यनेता पदावर दावा ठोकला आहे. याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना पक्ष व धनुष्यबाणच चिन्हाबाबतचा निर्णय अद्याप दिलेला नाही. यामुळे ठाकरे गटानं लोकाधिकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. खासदार अनिल देसाई यांच्या खांद्यावर उध्दव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ठाकरे गटाकडून लोकाधिकार महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यावर्ती कार्यालयातून याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. लोकाधिकार महासंघाच्या अध्यक्षपदी खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. महासंघाच्या अध्यक्षपदी शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सरचिटणीसपदी प्रदीप मयेकर तर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी आमदार विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दिनेश बोभाटे यांना संघटन सचिव करण्यात आले आहे. शिवसेना मध्यावर्ती कार्यालयातून ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून कायम राहणार की..?
बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनीच अर्थात 23 जानेवारी 2013 रोजी शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची निवड झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्यकारिणीने पक्षप्रमुख म्हणून पुन्हा निवड केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे काय होईल? उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून कायम राहणार की, त्यांना पायउतार व्हावं लागणार का? निवडणुका घ्याव्या लागणार का? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.