येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मराठवाडा व नाशिक विभागाचे प्रादेशिक अभियंता उदय पाटील, सोलापूर विभागाचे यांत्रिक अभियंता व्ही. के. लोंढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रिसिजनच्या चिंचोळी प्लांटला भेट देऊन “ऑरेंज टायगर” या भारतातील पहिल्या मध्यम आकाराच्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसची पाहणी केली.
यावेळी प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा यांनी त्यांना या प्रकल्पाची माहिती दिली. एस टी च्या या शिष्टमंडळाने प्रिसिजन – इमॉस च्या माध्यमातून तयार होणाऱ्या LCV आणि मालवाहू ट्रकच्या उत्पादनाबाबत चर्चा केली. आजवर प्रिसिजन – इमॉसने युरोपात विविध उपयोगांसाठी ७०० हून अधिक रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक वाहने तयार करून यशस्वीरीत्या पुरवठा केली याबद्दल प्रिसिजनचे कौतुक केले.
राज्य परिवहन महामंडळ नजीकच्या काळात इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर भर देणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावर एका अभ्यास गटाद्वारे
रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसबाबत संपूर्ण तांत्रिक माहिती घेण्यासाठी ही भेट होती.
“प्रिसिजनने काळाची पाऊले ओळखून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ही बस तयार केली आहे.” अशी प्रतिक्रिया उदय पाटील यांनी दिली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना ही बस आणि प्रिसिजनचा हा प्रकल्प पाहण्यासाठी नक्की आग्रह करू, असेही उदय पाटील म्हणाले.
या भेटीसाठी उपअभियंता यू. एस. जुंदाले, तसेच राहुल कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यावेळी उपस्थित होते. या सर्व सदस्यांनी “ऑरेंज टायगर” या इलेक्ट्रिक बसमधून फेरफटका मारला.