सोलापूर – भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात १२ आणि १३ ऑक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक संचालनालय आयोजित हे दोन दिवसीय कार्यक्रम रविवारपासून सुरू होत आहेत. रविवार १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या वेळेत भारतीय संविधानावर आधारीत ” राष्ट्रग्रंथ – आधारस्तंभ लोकशाहीचा ” या दोन अंकी मराठी नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर हे या नाटकाचे लेखक असून कुमार सोहोनी दिग्दर्शक तर दर्शन हिना व जगदीश महाजन निर्माता आहेत. मुंबईची आर्टिस्टिक ह्यूमन्स निर्मिती संस्था आहे. २० यशस्वी कलाकार हे नाटक सादर करणार आहेत.
सोमवार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी याच वेळेत ” गौरव गाथा संविधानाची ” हे नाटक सादर होईल. अभिजीत कोसंबी, प्रसन्नजीत कोसंबी, शाहीर सुभाष गोरे,निखिल भालेराव, सायली साठे, संदेश कांबळे,वैशाली आगलावे आणि सुहास सदाफुले हे कलाकार हे नाटक सादर करणार आहेत.
हुतात्मा स्मृती मंदिरात होणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार धैर्यशील मोहिते – पाटील,खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील, अरुण लाड, जयंत आसगांवकर, सुभाष देशमुख, दिलीप सोपल, विजय देशमुख, नारायण पाटील, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, उत्तमराव जानकर, राजू खरे,अभिजीत पाटील, बाबासाहेब देशमुख आणि देवेंद्र कोठे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन, राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.