येस न्युज मराठी नेटवर्क । काश्मीरमध्ये नवीन पर्यटन हंगाम सुरू होताच आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. पूर्वेतील सिराज बाग म्हणून ओळखले जाणारे इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी सुरु केलं होते. ट्यूलिप गार्डन जबरवन पर्वत रांगाच्या पायथ्याशी स्थित असून आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन आहे.
ट्यूलिप गार्डन सुमारे 30 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. काश्मीर खोऱ्यात फुलांची शेती आणि पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने हे उद्यान उघडण्यात आले होते.
या बागेत यावर्षी विविध प्रकारची सुमारे 15 लाख फुलांची लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत बागेत सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ट्यूलिप गार्डनमध्ये यंदा 62 प्रकारच्या ट्यूलिप्स आहेत. ट्यूलिपची फुले सरासरी तीन ते चार आठवडे टिकतात. परंतु मुसळधार पाऊस किंवा जास्त उष्णतेमुळे ते नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. फ्लोरीकल्चर विभाग टप्प्याटप्प्याने ट्यूलिप्स लावतं जेणेकरून फुले बागेत महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकतील.
काश्मीर खोऱ्यात नवीन पर्यटन हंगाम सुरू झाल्याने पर्यटन विभागाने पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागेत सांस्कृतिक कार्यक्रमाची योजना आखली आहे.
ट्यूलिप गार्डन उभारण्यामागील उद्देश म्हणजे पर्यटकांना आणखी एक पर्याय देणे. येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात.