येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने प्रमुख शहरांत निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम म्हणून रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी दैनंदिन रुग्णसंख्या सात हजाराच्या घरात पोहचली होती. हा आकडा आज पाच हजारावर आला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात करोनाचे ५ हजार २१० नवीन रुग्ण आढळले असून त्याचवेळी ५ हजार ३५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. करोना मृत्यूंचे प्रमाणही आज कमी झाले आहे. लॉकडाऊनचे संकट घोंगावत असताना ही आकडेवारी दिलासा देणारी ठरली आहे.
करोनाचा धोका वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील करोनाची सद्यस्थिती समोर ठेवली. काही भागांत होणारी रुग्णवाढ किती धोकादायक आहे, हे आकडेवारीनिशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. करोनाचे नियम पाळा. विनाकारण घराबाहेर पडू नका. विनामास्क फिरू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा, अशी वारंवार विनंती करतानाच लॉकडाऊन नको असेल तर करोनाविषयक नियम पाळावेच लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. त्याचवेळी सार्वजनिक, राजकीय आणि सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांनाही मुख्यमंत्र्यांनी मनाई केली. दरम्यान, दुसरीकडे प्रशासनस्तरावरही निमयांची काटेकोरपणे अंमलबजावणी आधीपासूनच सुरू करण्यात आली आहे. या सर्वाचा परिपाक म्हणून राज्यात रुग्णसंख्या पुन्हा एकदा कमी होताना दिसू लागली आहे.