येस न्युज मराठी नेटवर्क : करोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सण-उत्सवांप्रमाणेच यावर्षी शिवजयंतीही साधेपणानं साजरी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गर्दी होणारे कार्यक्रम टाळणे आणि मिरवणूक काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. करोनाचा प्रभाव कमी झाल्याने शिवजयंतीपासून उत्सव साजरे करण्यास परवानगी मिळेल, या अपेक्षेवर असलेल्या कार्यकर्त्यांची यामुळे निराशा झाली आहे.
पुढील शुक्रवारी म्हणजे १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तारखेनुसारची शिवजयंती सरकारी पातळीवर आणि अनेक संस्था, संघटनांकडून साजरी करण्यात येते. तर तिथीनुसार येणारी शिवजयंती शिवसेनेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे साजरी केली जाते. करोनाच्या पार्श्वभूमिवर यासंबंधी काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले होते. राज्य सरकारने करोनाविषयक उपाययोजनांना २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शिवजयंतीवरही निर्बंध आले आहेत. यासंबंधी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.