सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी सोलापूर शहरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर येथे पारंपरिक गजीनृत्याचे जोरदार सादरीकरण करण्यात आले.
गजीनृत्याच्या सादरीकरणापूर्वी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ‘मी अहिल्या बोलतेय’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण झाले. विद्यापीठातील ललित कला संकुलांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी या नाट्याचे सादरीकरण केले. डॉ. अमोल देशमुख दिग्दर्शित या नाट्यप्रयोगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भूमिका श्वेता गावडे यांनी अतिशय उत्तमपणे साकारली. तीस मिनिटाच्या या नाट्यप्रयोगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जीवनकथा सुंदररित्या मांडण्यात कलाकारांना यश आले. उपस्थित प्रेक्षकांकडून त्यांच्या या कलेस उत्सुकपणे दाद देण्यात आली.
यावेळी नाट्यप्रयोगातील कलाकारांचा आणि गजीनृत्य प्रमुखांचा कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी सन्मान करत त्यांचे आभार मानले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, सिनेट सदस्य यतीराज होनमाने यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी व व पंचक्रोशीतील कलाकारांनी गजीवनृत्याचे सादरीकरण केले. देविदास वाघमोडे यांचे यासाठी सहकार्य लाभले. ढोल, पिपाणी या पारंपरिक वाद्यावर कलाकारांनी गजीनृत्याचे सारीकरण केले. सोलापूरकरांनी या गजीनृत्याचे कौतुक केले.