सोलापूर : महापालिकेतील 1995 नंतरच्या 237 रोजंदारी, बदली आणि 22 वाहन चालक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रलंबित प्रस्ताव महापालिका प्रशासनाने शासनाकडे त्वरित पाठवावा अशी मागणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
महापालिकेतील दि. 6 एप्रिल 1995 नंतरचे असलेले रोजंदारी, बदली कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून शहरातील साफसफाईचे काम करत आहेत. कोविडसारख्या जीवघेण्या महामारीमध्ये सुद्धा आपल्या कुटुंबाची परवा न करता कर्तव्य पार पाडले. या कर्मचारीपैकी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काहीजण मरण पावले आहेत.
सेवेत कायम करण्याच्या शासनाच्या सकारात्मक धोरणानंतर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. तर दुसरीकडे महापालिकेतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून अनेक वेळा नगर विकास खाते मंत्रालय यांच्याकडे बैठका लावून निवेदन सादर केली आहेत.
रोजंदारी बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची कार्यवाही महाराष्ट्र शासनाने सुरु केली असून या संदर्भातला प्रस्ताव सोलापूर महापालिका सामान्य प्रशासन विभागाने तयार केला आहे. तो त्वरित शासनाकडे पाठवावा म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन पाठपुरावा करत आहे. महापालिकेत हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो त्वरित नगरविकास विभागाकडे पाठविल्यास शासन स्तरावर पुढील कार्यवाही होऊन या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा अशी मागणी युनियनच्या वतीने केली आहे. दरम्यान, हा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेस पाठवला जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळास दिले. यावेळी युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, उपाध्यक्ष बी. टी.जाधव, अरुण मेत्रे, गौतम नागटिळक, राम चंदनशिवे, रवींद्र कदम, सायबना हदीमनी व पदाधिकारी उपस्थित होते.