सोलापूर/ पंढरपूर, दिनांक 24(जिमाका):- पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. पंढरपूर येथे आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्र या चार वाऱ्या भरतात. सध्याची दर्शन रांग व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे दर्शन मंडप व स्काय वॉक या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने 129.49 कोटीचा आराखडा तयार केलेला होता. हा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य शिखर समिती समोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सादर केला. या आराखड्यास समितीने मंजुरी दिलेली असून पुढील आठ दिवसात याबाबतचा शासन निर्णय निघणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे उपस्थित होते.
जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिलेला दर्शनमंडप व स्काय वॉक आराखडा मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्च अधिकार समितीकडे पाठवण्यात आला. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या 129.49 कोटीच्या आराखड्यापैकी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून 23 सप्टेंबर रोजी मंजूरी दिली. आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत दर्शन मंडप व स्काय वॉक साठी 129.49 कोटी चा आराखडा समितीने मंजूर केलेला आहे.