डब्ल्यु.आय.टी. मध्ये ‘आविष्कार २०२४’ विद्यापीठस्तरीय संशोधन महोत्सवास सुरुवात
दैनंदिन मुलभूत गरजा आणि वारंवार येणाऱ्या समस्यांवर शाश्वत उपाय शोधणे म्हणजेच वैज्ञानिक संशोधन म्हणता येईल. विद्यापीठ आणि महाविद्यालयस्तरावर आयोजित अशा संशोधन महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या नवनव्या कल्पनांचा आविष्कार होत असतो. सर्वसमावेशक समस्यां निवारणाची कल्पकता पुढे आणणे हाच या संशोधन महोत्सवाचा उद्देश्य असल्याची भूमिका पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर प्रकाश महानवर यांनी मांडली.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे सभागृह दोन मिनिटे मौन ठेऊन दुखवट्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मध्ये आयोजित ‘आविष्कार २०२४’ विद्यापीठस्तरीय संशोधन महोत्सवास सुरुवात करण्यात आले.
वालचंद शिक्षण समूहाचे विश्वस्त श्री वैभव गांधी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी विभागप्रमुख प्रो. प्रवीण सप्तर्षी, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्राचार्य डॉ. विजय आठवले,प्रा. विकास पाटील, विद्यापीठ आविष्कार समन्वयक डॉ. विनायक धुळप, डॉ. अशोक शिंदे यांच्यासह अविष्कार २०२४ महाविद्यालातर्फे समन्वयक डॉ. सतीश काशीद, डॉ. रश्मी दीक्षित आदी उपस्थित होते.
रिसर्च अँड डेव्हलपमेंट असे संशोधन होणे अपेक्षित असताना आर अँड डी अर्थात रिसर्च अँड डुप्लिकेटचा अक्षरशः स्तोम वाढला आहे, असे सांगत कुलगुरू प्रो. महानवर यांनी वातावरणातील दोन अंश सेल्सियस तापमान कमी करण्यासाठी करोडो रुपयांचा चुराडा संशोधनाच्या नावावर केला जात असल्याचे शल्य त्यांनी व्यक्त केले.
अगदी छोट्या-छोट्या संशोधकवृत्तीही या महोत्सवाचा एक महत्वाचा भाग बनू शकते, असे सांगत प्रो. प्रवीण सप्तर्षी म्हणाले की, विकसित देशाचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या विकसनशील देशातील आणि आपल्या परिसरातील अगदी ग्रामीण जीवनमान उंचावण्यावर केलेले संशोधन या महोत्सवात विद्यार्थ्याकडून मांडले जाणे अपेक्षित असल्याचे प्रा. सप्तर्षी यांनी स्पष्ट केले.
या महोत्सवात पदवी, पदव्युत्तर आणि पीच.डी. स्तरावरील ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे विविध स्तरांवरील संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनाची झलक पाहण्याची संधी २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत सर्वांसाठी निःशुल्क खुले असणार आहे. प्रकल्पांचे सादरीकरण, चर्चासत्रे आणि प्रदर्शन या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक दृष्टिकोनाला नवी दिशा प्राप्त करण्यासाठी विद्यार्थीवर्ग आणि वैज्ञानिक संशोधकप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले.