देशी वृक्ष संवर्धनचळवळीला प्राधान्य देण्यासाठी उचलले सकारात्मक पाऊल
सोलापूर – वाढत्या सिंमेटच्या जंगलाच्या पार्शवभूमीवर तापमानाचे संतुलन राखण्यासाठी ‘मियावॉकी’ जंगलाची कल्पना सध्या रूढ होताना दिसत आहे. वन विभागापाठोपाठ रेल्वे विभागानेही सोलापूर विभागातील पहिले मियावाँकी जंगल रेल्वे प्रशिक्षण केंद्राच्या जागेत साकारले आहे. देशी वृक्ष लागवडीच्या चळवळीला प्राधान्य देत रेल्वे विभागाची पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल घेतले आहे.
वाढत्या सिंमेटच्या जंगलामुळे वाढणारे जागतिक तापमान रोखण्यासाठी मियावॉकी हा एक उत्कृष्ट पर्याय समोर येत आहे. कमी वेळेत, कमी जागेत मोठी वाढ होणारा जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती करणारा हा जंगल प्रकार आहे. वन विभागाने सिद्धेश्वर वन विहारात उभारलेल्या मियावॉकीचा आदर्श घेत रेल्वे विभागानेही पुढाकार घेऊन मियावॉकी जंगल तयार केले आहे. अवघ्या आठ महिन्यात हे जंगल दहा फुटांहून अधिक उंच झाले असून यातील अनेक झाडांना फळे आणू फुले लागली आहेत. पुढील पाऊल उचलत रेल्वे विभागाने याच ठिकाणी आणखी ७०० चौरस मीटर जागेत मियावाँकी पद्धतीने झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. लवकर बार्शी, कुर्डुवाडी व पंढरपूर येथेही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
काय आहे मियावाँकी ? मियावाँकी ही मानवनिर्मित तापमान जंगलपद्धती असून यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकेद्वारे कमीत कमी जागेत जास्ती जास्ती देशी वृक्षांची लागवड केली जाते. एका चौरस मीटर जागेत तीन झाडे साधारणपणे एक हजार चौरस फूट जागेत २५० मोठे उंच, मध्यम लहान अशा प्रकारचे ४५ ते ५५ विविध जातीची झाडे लावली जातात. सूर्यप्रकाशाच्या स्पर्धेसाठी त्याची वाढ झपाट्याने होते.
सोलापूर शहरातील विविध पर्यावरणप्रेमी संस्था व व्यक्ती यांचे मार्गदर्शन, रेल्वे व लोकसहभागातून रेल्वे प्रशिक्षण केंद्राच्या जागेत २२५ चौरस मीटर जागेवर मियावाँकी जंगल तयार केले आहे. ५ जून २०२२ रोजी हे वृक्षारोपण करण्यात आले. सुरवातीला या जागा खोदून रेल्वे कॉलनीच्या ओल्या कचऱ्यापासून तयार केलेले कंपोस्ट, बगॅस, कोकोपीट व काळी माती वापरून बेड तयार करण्यात आले. यावर मियावाँकी पद्धतीने ५५ प्रकारच्या देशी प्रजातीची रापे लावण्यात आली. सर्व रोपे एकाचवेळी न लावता शास्त्रीय पद्धतीने सुमारे तीन आठवड्यात लावण्यात आली. वड पिंपळ, कडुनिंब, कदंब, साग, शेवगा, तुळस, पपई, केळी या देशी प्रजातीची लागवड करण्यात आली असून अवघ्या आठ महिन्यात आज दहा फुट उंचीचे जंगल तयार झाले आहे.
रेल्वेच्या जागेवर पर्यावरणप्रेमींच्या मार्गदर्शनाने व रेल्वे अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे मियावॉकी जंगल तयार करण्यात आले. जय हिंद शुगर बगॅस व माऊली फाउंडेशन रोपे देऊन सहकार्य केले. सीएसआर फंडातून लवकरच वाडी (कर्नाटक), पंढरपूर, बार्शी, कुर्डुवाडीत वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ रेल्वे सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम यांनी या वनाबाबत सांगितले.
या मियावॉकी जंगलात फेरफटका मारण्यासाठी काल पर्यावरणप्रेमींची एकच गर्दी झाली होती. यावेळी अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली सरानी उपस्थिताना मार्गदर्शन केले व विविध पर्यावरणीय संस्थांना उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले.