प्रतिनिधी | सोलापूरहुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात शनिवारची (दि.७) संध्याकाळ श्रोत्यांसाठी अविस्मरणीय अशीच ठरली. व्यासपिठावर सूर बोलत होते आणि मन मंत्रमुग्ध होत होतं. प्रिसिजन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित अकराव्या प्रिसिजन संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोलापूरकर रसिकांनी केवळ संगीत ऐकलं नाही, तर ते मनापासून अनुभवलं. पहिल्या दिवशी सूरांनी मन जिंकले अन् स्वरांनी आत्मा.

पहिल्या सत्रात प्रख्यात सतारवादक निखिल पटवर्धन यांनी राग पुरिया कल्याणने जणू संध्याकाळी एक शांत दीप प्रज्वलित केला. सतारीचा पहिला सूर उमटताच सभागृहातील प्रेक्षक शहारले. आलापातून हळूहळू उलगडणारे सूर मनाचा खोलवर ठाव घेत होते. ते कधी मौन प्रश्न विचारत होते, तर सूर सतारीतून त्यांना उत्तर देत होते. विलंबित बंदिशीतल्या गहिऱ्या छटा आणि द्रुत बंदिशीतील तेजस्वी उंची यांतून एक भावप्रवास उलगडत गेला. मारवा थाटातील या रागात सतार जणू स्वतःशीच संवाद साधत होती आणि रसिक त्या संवादाचे साक्षीदार बनले होते. तबल्यावर पांडुरंग पवार यांनी दिलेली समर्थ साथ या सुरेल संभाषणाला अधिक अर्थपूर्ण बनवत होती. सतार आणि तबल्याच्या या जुगलबंदीतून जे काही घडत होतं, ते ऐकणं नव्हतंच, ते जगणं होतं. सुरुवातीला निखिल पटवर्धन यांनी सतारीबद्दल सांगितलेले काही शब्दही रसिकांच्या मनाशी थेट नातं जोडणारे ठरले.दुसऱ्या सत्रात स्वरांनी भावनांचा हात धरला.

सुप्रसिद्ध गायिका मंजिरी कर्वे-आलेगावकर यांच्या आवाजातली सोज्ज्वळता सभागृहात पसरताच वातावरण अंतर्मुख झालं. राग जयताश्रीमधील त्यांचे सूर मनाला अलगद स्पर्श करत होते. जणू कुणी आपल्याशी हळूच संवाद साधावा असे. पंडित कुमार गंधर्वांचा तराना सादर करतानाच आलेगावकर यांनी स्वरांमधल्या आघातांचे महत्वही स्पष्ट केले. शुद्ध निषादात सादर राग बिहागडामध्ये तर रसिक पूर्णपणे हरवून गेले आणि संत कबीरांच्या निर्गुणी भजनावेळी… काळ जणू थांबलाच. सभागृह स्तब्ध झाले. फक्त उरले ते भाव. प्रत्येक ओळ मनात खोलवर झिरपत होती, डोळ्यांत नकळत ओल आणत होती. हार्मोनियमवर सौरव दांडेकर, तबल्यावर अजित किंबहुने आणि तानपुऱ्यावर प्राची जोगळेकर आणि स्वराली आलेगावकर यांनी दिलेली साथ या भावनांना आधार देणारी ठरली.

भजन संपल्यानंतर क्षणभराची शांतता आणि त्यानंतरचा ‘वाहवा’ हा रसिकांच्या अंतःकरणातून उमटलेला प्रतिसाद होता.सायंकाळी अचूक ६.२५ वाजता सुरू झालेल्या या मैफलीने पहिल्याच दिवशी महोत्सवाची उंची निश्चित केली. प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक यतिन शहा, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा, मयुरा शहा, डॉ. सुधांशु चितळे आणि डॉ. किरण चितळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले आणि त्या दिव्याच्या उजेडात संगीताचा हा भावयज्ञ सुरू झाला. रविवारी (दि.८) महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही रसिकांसाठी संगीताची भावसमृद्ध संध्याकाळ सजणार आहे.
पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक एस. आकाश यांच्या बासरीतून निर्मळ सूर उमटणार आहेत तर यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिनमधून भावनांचा नवा संवाद उलगडेल. तबल्यावर ईशान घोष साथ देतील.महोत्सवाच्या अंतिम सत्रात सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांच्या आवाजातून भक्ती, भाव आणि शास्त्रीयतेचा संगम अनुभवायला मिळणार असून, तबल्यावर प्रशांत पांडव आणि हार्मोनियमवर अभिषेक शिनकर साथसंगत करतील.हा महोत्सव म्हणजे केवळ सूर-स्वरांची मैफल नाही.तो मनाशी मन जोडणारा, आठवणींत रेंगाळणारा आणि अंतःकरणात दीर्घकाळ उजळत राहणारा संगीतअनुभव आहे.
