सोलापूर, दि. 9 नोव्हेंबर- दोन वेळा आमरण उपोषण करून आंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची लढाई ही सुरुच आहे. त्यांनी सरकारला 2 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. यामुळे त्यांनी दुसर्या टप्प्यातलं उपोषण आता मागेही घेतलं आहे. मात्र सरकारकडून राज्यातील विविध जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कुणबी नोंदी तपासण्याचे काम गतीने सुरू आहे. या कुणबी दाखले नोंदीवर चर्चा करण्यासाठी येथील सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मराठा आरक्षण जिल्हा समन्वय कक्षाचे समन्वयक तथा आरडीसी दादासाहेब कांबळे यांची आज (दि.9) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
या बैठकीसाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने समन्वयक माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख, विनोद भोसले, पुरुषोत्तम बरडे, श्रीकांत डांगे, महादेव गवळी, हेमंत पिंगळे, सचिन टिकते, प्रकाश डांगे, गणेश डोंगरे, संजय टोणपे, सचिन जगताप, राहूल साळवी, येताळा भगत, अरविंद केदार, राज साळुंखे, सोमनाथ राऊत, बाबासाहेब निंबाळकर, किरण गाढवे, सचिन पवार, सज्जन घाडगे, डॉ. स्मिताताई पाटील, अॅड. श्रीरंग लाळे आदींची उपस्थिती होती.
यावेळी शहर-जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने कुणबी दाखल्यांवर चर्चा करताना जिल्हा प्रशासनाकडे मोडी वाचन करणारे एकजणच असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्यातील विविध 7 संस्थानांच्या मोडी लिपी तपासणे अशक्य नसल्याचे सांगितले. यासाठी प्रशासनाच्या वतीने जाहीर निविदा काढून आणखी 4 ते 5 मोडी अभ्यासक मानधन तत्वावर नेमावेत, इतकेच कायतर विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी दाखले, जन्म-मृत्यू दाखलेही तपासणीचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढावेत, अशीही मागणी करण्यात आली. सध्या कुणबी दाखले तपासण्याची जिल्ह्यात यंत्रणा तोकडी असून, ती वाढवावी असे सांगण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या मागण्यांचा आम्ही प्रकर्षाने विचार करू, अशी ग्वाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.